Friday 28 February 2020

शीमा

पोरगी पवित्र आहे का?
हिंगणघाटच्या निर्भयाची मृत्यूशी झुंज अपयशी ठरली. नि:शब्द वेदनांचा श्वास थबकला आणि कोडग्या समाजाच्या थडग्यावर आणखी एक निंदनीय नोंद झाली. सोशल मीडियावर निषेधाच्या पोस्टींचा ऊत आला. पुन्हा अशा पोस्टींचा पूर येणार नाही, याची शाश्वती नाही. प्रेम आणि वासनेत होणारी गल्लत वासनांधतेकडे जाते आणि आपल्या आजूबाजुला नराधम निपजू लागतात, हे कळतही नाही. नाही तरी आपण केवळ संवेदनशीलतेची झूल पांगरलेली असते. वास्तवापासून कोसोमैल दूर असतो. लग्नाच्या आणि संसाराच्या बाजारात नात्यांच्या गुंत्यात खुळचट कल्पनांमुळे चार भिंतीआडचे अत्याचार कुणाला दिसत नाहीत. म्हणूनच असंख्य माताभगिनी आपल्या आत्मसन्मानांवर होणारे बलात्कार निमूटपणे सहन करीत राहतात. त्यांच्या वेदनांना शीमाच उरत नाही.
हो! ‘शीमा! ते नाटकाच नाव आहे; पण शीमा हे नाटक नाही. ते वास्तव आहे. पुरूषी रानटी अपेक्षांच्या खपल्या काढणारी ती कलाकृती आहे. ती अनुभवताना माणसांत वसलेल्या हैवानाची जाणीव दृष्यागणिक होत राहते. त्यामुळे शीमा हे नाटक राहत नाही. आपले उघडे डोळे न टिपू न शकणारे प्रसंग किंवा माझा काय संबंध म्हणत दुर्लक्षित होणारी घटना हुभेहूब आपल्यासमोर रंगमंचीय अविष्कारातून सादर होते. त्यावेळी मात्र निब्बर डोळ्यांनाही पाझर फुटतो. असे एक संवेदनशील नाटक दिग्दर्शक वैभव सातपुते यांनी पारमिता फाऊंडेशनच्या माध्यमातून रंगमंचावर आणले आहे. ते स्वत: श्री. सातपुते आणि श्री. राहुल साळवे यांनी लिहिले आहे. महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतील ठाणे केंद्रावरील हे विजेते नाटक आहे.
शालेय वयातली मुलेमुली बिनधास्त हिंदडत असतात. खेळत असतात. त्यांच्यातली निरागसता मोहक आणि लाडीक असते; पण मुलगी मोठी होऊ लागली की, आई- वडिलांना काळजी वाटू लागते. मुलीची बाई होऊ लागली की, त्यांची काळजी वेगळ्याच वळणावर येऊन ठेपते. नंतरचा मार्ग सरळ असला तर ठिक; अन्यथा प्रत्येक वळणावर आई- वडिलांना विशेषत: मुलीला क्षणोक्षणी अग्निदिव्याला सामोरे जावे लागते. त्यातही खुळचट कल्पनांमध्ये गुरफटलेल्या समूहांतील मुलींचे जगणे आणखीच वेदनादायी होते. शीमाच्या माध्यमातून मांडलेल्या या वेदनांचा जागर काळीज चिरतो.
शाळा सुटल्यानंतर नियमितपणे जवळच्या डोहाजवळ खेळणाऱ्या नाम्या (मयूर साळवी) आणि शीमाच्या (रंजना म्हाब्दी) निरागस मैत्रीत वाढते वय आड येते. दारुतच स्नान करणाऱ्या शीमाच्या बाप- पांडबाला (सुशिल शिर्के) त्या दोघांविषयी कुणी तरी काही तरी सांगितलेले असते. शीमा घरी आल्यावर मुलगीही आईच्याच वळणावर गेल्याचे म्हणत पांडबा शीमा आणि तिची आई- सुमनला (शीतल जाधव) मारझोड करतो. कोणी तरी त्याचे कान भरलेले असतात. एका व्यक्तिबाबत सुमनवर संशय घेतो. उलट पांडबातच आता मर्दानगी राहिली नसल्याचे सांगत ती व्यक्ती सुमनला लुगडं फेडायला सांगते. हे ऐकल्यावर आपल्या मर्दानगीला कुणी तरी आव्हान देत असल्याच्या त्राग्यातून त्याचा पुरुषी अंहकार जागा होतो आणि तो मर्दानगी सिद्ध करण्यासाठी सज्ज होतो.
शीमालाही हे सगळे असह्य होते. ती नाम्याजवळ व्यक्त होण्याचा प्रयत्न करते. आई काळजीपोटी तिला समजवत असते. मोठ्या माणसांचं ऐकायचं असतं. पुरुषाच्या जातीवर जास्त विश्वास ठेवायचा नसतो. बाईच्या जन्माला जगण्याची रीतभात असते पोरी.’’ आईचे हे शब्द तिला अस्वस्थ करतात. मलपला आजा तुपला बाप. तुमला नवरा मपला बाप. त्यांच्यावरही विश्वास ठेवायचा नसतो का? असा प्रश्न शीमा करते. मनुष्य घाणेरडा प्राणी आहे. मोठी झाली की कळंल तुला आपोआप. पोरीच्या जातीनं सवाल करायचे नसतात. पोरगी कळती झाली की दुसऱ्याची बाई, बाईची आई आणि आईची आजी कधी होते ते तिलाही कळत नाही. या शब्दांत सुमन समजविण्याचा प्रयत्न करते. हे प्रारंभीचे संवाद प्रेक्षकांचा अंतर्मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करतात.
शीमाच्या परकरला रक्ताचा डाग लागतो. तिच्या लग्नाची घाई सुरू होते. रक्ताचा डाग लागत नाही, तोवर तुझं आयुष्य तुझं. तू आता स्वताची नाही राहिली पोरी. हे आईचे बोल शीमाला अस्वस्थ करू लागतात. तिचे लग्न ठरते. आपल्या जन्मसिद्ध हक्काच्या आवेशात मुलाकडची मंडळी पोरगी पवित्र आहे का? असा प्रश्न विचारते. त्याचे उत्तर अमानवीय कौमार्य चाचणीतून द्यायचे असते. त्यानंतर तिच्या आयुष्यात रावसाहेब (नितीन जाधव) येतो. पहिल्याच रात्री खोटा माल सांगत सहा-सात बायकांना टाकून देणारा पंच- नाना (प्रमोद पगारे) वेगवेगळे डाव मांडत राहतो. नाटकाचे कथासूत्र पुढे जात असते. प्रेक्षक म्हणून आपल्या अस्वस्थतेचाही कडेलोट होऊ पाहतो. कोणाचे डोळे पाणावतात. कोणाच्या डोळ्यांना धारा लागतात. आपण स्वत:मध्ये डोकावू लागतो. बुरसटलेल्या विचारांच्या खपल्या उसवण्याची संधी मिळते. या अनुभूतीसाठी प्रत्यक्ष नाटकच बघणे आवश्यक आहे. इथेच संपूर्ण कथानक जाणून घेतल्यास ही अनुभूती खोलवर रुजू शकणार नाही. ती नाटकाच्या भाष्यातच घ्यायला हवी.
समाजाच्या रीतीभातांचे ओझे किती पेलावे? बाप-लेकीची ताटातूट करणारा समाज आपला असतो का? बाईचं माणुसपण नाकारणाऱ्या समाजाला आपला म्हणावे का? पदराआड चेहरा लपवत दुधाचा ग्लास घेऊन येणारी बायको आणि मग अंधार! सिनेमात दाखविल्या जाणाऱ्या या दृष्यांची संगती जुळवत तयार होणारी संकल्पना म्हणजे लग्न का? असे अनेक प्रश्न नाटक पाहताना आपल्यालाही सतावू लागतात.
शीमातल्या संवादांना अलंकारीक भाषेने सजविलेले नाही. साध्या, सरळ, सोप्या शब्दांतले संवाद अत्यंत भेदक आहेत. चादर लाल झाली असती तर सोन्यानाण्यानं मडवली असती. पोरगी उष्टी निघाली. दोन्ही रांडा शील फुटलेल्या. आमच्या नशिबात उद्‌घाटनाचं सुख नाही. आणि बाई मन लावायची गोष्ट आहे वय. माल खोटा काढावा लागतो. हे पुरुषी मानसिकतेचे संवाद कौर्याचे टोक गाठतात.
सगळ्या कलावतांनी जबरदस्त मेहनत घेतली आहे. शीमा आणि नाम्याच्या भूमिकेतले रंजना म्हाब्दी आणि मयुर साळवी प्रेक्षकाच्या मनावर राज्य करतात. शीमाबद्दल तर काय बोलावं, काय लिहावं! इतकी भन्नाट शीमा रंजनाने साकारली आहे. शालेय विद्यार्थिनी रंगविताना रंजनाचा रंगमंचावरचा सहज वावर अल्लड आणि गोंडस असतो. दुसऱ्या अंकांत शीमाच्या भूमिकेत रंजना शिरते आणि त्यात गुंतते तेव्हा प्रेक्षकांनाही त्रास असह्य होतो. संपूर्ण नाट्यगृह स्तब्ध होते. सुन्न होते. फक्त डोळ्यांना धारा असतात. शीमा साकारताना रंजनाला काय वेदना होत असतील, या विचारानेच कापरं भरू लागते. प्रयोग संपल्यानंतरही रंजनाला शीमाच्या भूमिकेतून बाहेर येता येत नसावे, इतकी ती त्यात गुंतलेली असते.
शीमानंतर मनात नाम्याचे पात्र ठसते. ते मयुर साळवीच्या अभिनयामुळे! नाम्या संपूर्ण प्रयोगभर निरागस भासतो. निरागसतेतून तो जगण्याचे सहज, सुंदर तत्वज्ञान सांगत राहतो. मोठ्यांविषयी बोलून आपलं थोबाड घाण करायचं नसतं. मोठं होत नाही तोवर मोठ्यांचे कायदे माहित नसतात. हे माहीत असतं तर झक मारून मोठा झालो नसतो आणि ठरविलं तर ढग बी फोडता येतो. नाम्या हे संवाद उच्चारतो तेव्हा सगळ्या टाळ्या लेखकांसोबत मयूर साळवीच्या अभिनयाला मिळतात.
शीतल जाधवने साकारलेल्या आईची (सुमन) भूमिका मनात ठसते. अलीकडे चुलीवरच्या भाकरीचं भारीच कवतिकअसते; पण गॅसची तुलना केल्यास चूल हीच बाईसाठी पुरेशी शिक्षा होती. अर्थात, तेच प्राक्त समजून त्याच्यातच आनंद माणणाऱ्या आया-बहिणी अनेकांनी पाहिल्या असतील. त्यांची आठवण चुलीवरची सुमन बघताना होते. हा काही नाटकाचा विषय नाही, असो. संसारासाठी झटणारी, नवाऱ्याचे नको ते आरोप सहन करणारी, सामाजिक रुढीपरंपरेपेक्षा समाजाच्या दबावापोटी पोटाचा गोळा दूर सारणारी निर्दयी आई शीतलने उभी केली आहे. त्याच वेळी मुलीसाठी अंतर्मनात होणारी कासाविस शब्दांविना आपल्या ह्रदयापर्यंत पोहचविण्यात शीतल यशस्वी ठरते. तेव्हा प्रेक्षकांच्या मनाची घालमेल झाल्याशिवाय राहत नाही.
नितिन जाधवनेही रावसाहेबची खलभूमिका जबरदस्त रंगविली आहे. त्याच्या संवादातून आणि देहबोलीतून पुरुषी अंहकाराचे प्रतिबिंब पदोपदी उमटत राहते. त्याचवेळी हळव्या मनाचा रावसाहेबही प्रेक्षकांना भुरळ घालतो. अतिशय सकसपणे त्याने ही भूमिका साकारली आहे. सुशिल शिर्केने पांडबा साकारताना बेजाबदार बेवड्या बाप आणि समाजाचे ओझे न झुकारू शकणारा; तरीही मुलीसाठी तुकड्या तुकड्याने तुटणारा बाप दमाने उभा केला आहे.
प्रमोद पगारेने नाना नावाचा कपट प्रवृत्तीचा पंच रंगविला आहे. इतर पंचाच्या भूमिकेतले अनिश बाबर आणि विजय इंगळे यांच्या वाट्याला लहानशा भूमिका आल्या असल्या तरीही त्या नजरेआड होऊ शकत नाहीत. अनिश बाबरच्या तोंडी पोरी नो माथो खराब होई गयो अशा एक- दोन वाक्यांपुरते संवाद आहेत. तरीही देहबोली आणि वेशभूषेतून तो संपूर्ण रंगमंचावर छाप पाडतो. सुकेशनी काबंळे हिने स्वत:चे बाईपण आणि माणुसपण हरवलेल्या रावसाहेबच्या आईची छोटीशी भूमिका तडफदारपणे निभावली आहे. पोटी मुली जन्माला येणे, हे पापाचे फळ समजणाऱ्यांसारख्या विकृत मानसिकतेचे हे पात्र प्रतिनिधित्व करते.
सगळ्या टीमला अपेक्षित कथासूत्राच्या लयीत आणण्याचे आणि राखण्याचे काम श्री. सातपुते यांनी केले आहे. नाटकाचा विषय लैंगिक भावनांशी संबंधित आणि अतिशय संवेदनशील आहे. तरीही ते किंचित्सेही अश्लिलतेकडे झुकत नाही. उलट अश्लिलतेची घृणा वाटू लागते. विविध प्रसंगातल्या सूचकतेतून संपूर्ण भावविश्व उभे राहते. शीमाच्या लग्नाच्या तयारीच्या प्रसंगी शीमाच्या भोवती वर्तुळाकार फिरणारे तिचे आई- वडील प्रेक्षकाचे डोके चक्रावून टाकतात. त्या चक्रातून नाटक संपेपर्यंत सुटकाच नसते, ही त्यांच्या दिग्दर्शनातली किमया आहे.
श्री. नितीन मोकल यांच्या शब्दांनी सजलेल्या आता फोडली सुपारीआणि साज खुलताचं सये या गीतांमुळे नाटकाच्या आशयाची धग अधिक खोलर रूजते. श्री. सुशील कांबेळ यांचे संगीत आणि प्रवीण डोणे, कविता राम आणि लतेष पूजारी यांच्या स्वर नाट्यगृहाच्या बाहेर आल्यावरही कानाला कंप करत राहतात.
मध्यांतरानंतर टेकडीवरची दृष्ये शीमाच्या जगण्याच्या भीषणतेच्या झळा प्रेक्षकांपर्यंत पोहचवितात. पानगळ झालेल्या झाडांच्या काड्या आणि शेजारून गेलेल्या विजेच्या तारा शीमाच्या हाडांच्या काडांशी नातं सांगतात. पहिल्या अंकातले शीमाचे घर, ओसरीतली चुल, पाण्याचा माठ आदी प्रतिकात्मकतेत प्रेक्षकांच्या नजरा वास्तव शोधू लागतात. त्याचे श्रेय केवळ श्री. वैभव सातपुते यांच्या कल्पक नेपथ्याला आहे. श्री. निलेश प्रभाकर यांच्या नेपथ्य आणि प्रसंगाना साजेशा प्रकाश योजनेमुळे नाटकाचा आशय अधिक दमदार होतो. वैभव आणि निलेश यांचे हे कसब विषयाला आशयघनात प्राप्त करून देते.
शीमाच्या आयुष्याचं वाळवंट करणाऱ्या पंचाच्या भूमिकेतल्या अनिश बाबरच्या रंगमंचावरील छापमध्ये त्याच्या देहबोलीबरोबरच त्याची वेशभूषा आणि रंगभूषेचे मोठे श्रेय आहे. त्याचबरोबर उद्‌ध्वस्त झालेली शीमा साकारताना रंजना म्हाब्दी करपलेल्या आणि रापलेल्या चेहऱ्यानिशी समोर येत राहते. तेव्हा तिच्या अभिनयाला सलगपणे दाद मिळत राहते. अर्थात, ती दाद रंगभूषाकार जगदीश शेळके यांनाही असते.
लेखन, दिग्दर्शन, अभिनय, गाणी, नेपथ्ये सगळं भन्नाट आहे. हे नाटक चळवळीशी नातं सागते. म्हणून विषय आणि आशयाच्या ऑथेंटिसिटी महत्वाची ठरते. संशोधन हा विषयाचा गाभा असतो. तो पुरेपूर जपण्याचे प्रयत्न लेखक द्वयींनी केला आहे. आशय, विषय अनेकांच्या जगण्याचा भाग आहे. तो साध्या सरळ, सोप्या भाषेत थेट ह्रदयाला भीडतो. काळीज हेलावून टाकतो. शेवटी डोळ्यात पाणीही शिल्लक राहत नाही. पुरुषातलं जनावर अलगदपणे थिएटरमध्येच बाहेर फेकण्याची ताकद या नाटकात आहे. माणसाला माणूस करणारी ही कलाकृती ह्रदयाचा ठाव घेत राहते. प्रबोधनातून पुरुषी मानसिकतेत परिवर्तन घडवून आणण्याची ताकद यात आहे. माणुसपणाचा 'लाईफ टाईम रिचार्ज पॅक' वाटावा इतकी ती सशक्त आहे.
-जगदीश त्र्यं. मोरे
मो. 9967836687

No comments:

Post a Comment